- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : दोन्ही किडण्या निकामी झाल्याने गत वर्षभरापासून मृत्यूशी झूंज देणाऱ्या पतीला अर्थांगिनीने २६ फेब्रुवारीला किडनी देत जीवनदान दिले आहे. शिरपूर येथील दिपिका आणि संदीप काळे असे या दाम्पत्याचे नाव असून, सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.शिरपूर येथील संदीप काळे हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. वर्षभरापासून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. वर्षभरापासून त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू होता. किमान एक किडनी प्रत्यारोपण केल्याशिवाय जीवन जगणे कठीण असल्याचे पुणे येथील एका खासगी रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. संदीप याला जीवनदान देण्यासाठी सुरूवातीला त्यांच्या सासू बेबीताई भालेराव या किडनी देण्यास तयार होत्या. मात्र किडनी देण्याअगोदर त्यांचा रक्तदाब जास्त प्रमाणात कमी-जास्त होत असल्याच्या कारणास्तव जावयाला किडनी देणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी खर्च वाढून वेळही वाया गेला. अशावेळी भालेराव व काळे कुटुंबासमोरील पेच अधिकच वाढला. त्यातच संदीपची प्रकृती खालावत चालल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने दोन्ही कुटुंब चिंताग्रस्त झाले होते. ३२ वर्षीय पत्नी दीपिका, ८ वर्षीय मुलगा प्रथमेश, ५ वर्षीय मुलगी स्वरा यांचे जीवन अंधकारमय होण्याची चिन्हे दिसू लागली. अशावेळी दीपिकाने पतीला एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. पूणे येथील खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही विलंब न करता दिपीकाच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आणि दीपिकाची किडनी संदीपशी जूळत असल्याचे सांगितले. २६ फेब्रुवारी रोजी तज्ञ डॉक्टरांनी दीपिकाची एक किडनी काढून संदीपला जीवनदान दिले. किडनी प्रत्यारोपणनंतर संदीप व दीपिकाची प्रकृती ठणठणीत असून कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
किडनी देऊन पत्नीने दिले पतीला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 1:41 PM