वाशीम : व्यसनी पतीला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य केवळ पत्नीमध्ये असून ती सामंजस्याने व परिस्थिती हाताळून व्यसनामुळे बेचिराख होणारा आपला संसार सावरु शकते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गट समन्वयक व्ही.एस. रामटेके यांनी केले.
मंगरुळपीर येथील पंचायत समितीमध्ये सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जि.प. वाशीम अंतर्गत ६८ व्या व्यसनमुक्ती सप्ताहाअंतर्गत महिला मेळावा व कामगार मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी ए.जे. वाघमारे हे होते. तर मिटकॉनचे तालुका प्रशिक्षण समन्वयक देवानंद राऊत, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त शाहीर संतोष खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, दशसुत्री कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती या विषयावर नेहमी चर्चा होत असते आणि त्याचे दुष्परिणाम सांगीतल्या जातात. यावेळी शाहीर संतोष खडसे यांनी आपल्या शाहीरीतून कामगार व महिलांना लागलेले व्यसन हे एक कलंक असून एका दारुड्या पतीची गोष्ट सांगून उपस्थितांना भारावून टाकले. मेळाव्याला महिला व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.