लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी १ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत ४८ सापांना जीवदान देण्याची कामगिरी केली आहे. त्याशिवाय अपघातात जखमी झालेल्या वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहेत. त्यांची ही कामगिरी मानव-साप संघर्ष टाळून जैवविविधता टिकविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. ्रपर्यावरणाच्या वृद्धीसाठी जंगलाप्रमाणेच विविध प्राण्यांच्या प्रजातींचे महत्त्व अनन्य साधारण आहे. जंगलाप्रमाणेच विविध प्राणीमांत्रांचे अस्तित्व जैवविविधतेचा अविभाज्य घटक आहे. यात वन्यजीवांचा समावेश आहे. ही जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मंगरुळपीर येथील काही वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेची मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे शाखा आहे. या संघटनेचे सर्वच सदस्य वन्यजीवांच्या रक्षणासाठी परिश्रम घेत आहेत. या अंतर्गत मानव-साप आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ते प्रयत्न करीत असून, याच माध्यमातून संघटनेच्या सदस्यांनी गेल्या दीड महिन्यात ४८ सापांना त्यांनी जीवदान दिले. यामध्ये विषारी सापांची संख्या १६ असून, त्यात नाग, घोणस यांचे प्रमाण अधिक आहे. अपघातात जखमी झालेले रोहि, हरीण, माकड यांच्यावर उपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडण्यासह घोरपड, ससा, तितर, आदि पशूपक्ष्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
जैवविविधता टिकविण्यासाठी वन्यजीवरक्षकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 2:08 PM