लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शालेय विद्यार्थ्यांत सापांबाबत जनजागृती करून साप-मानव संघर्ष टाळण्याच्या अभियानात त्यांचाही सहभाग वाढविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मोहिम राबवित असून, यात विविध शाळांत सापांच्या चित्र प्रदर्शनीद्वारे विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनोजा येथील शाळेत शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. वन्यजीव रक्षणासह सापांचे अस्तित्व कायम ठेवून जैवविविधता राखण्यासाठी जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम ही संघटना उदयास आली आहे. या संघटनेच्या मूळ शाखेसह एकूण तीन प्रमुख शाखा आणि इतर काही शाखा आहेत. सद्यस्थितीत ३६ सदस्य या संघटनेत कार्यरत आहेत. वन्यजीवांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितानाच त्यांच्यावतीने साप-मानव संघर्ष टाळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रभावी माध्यम ठरू शकणाºया शाळांत विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळांत सापांच्या चित्राची प्रदर्शनी भरवून विद्यार्थी शिक्षकांना विषारी-बिनविषारी सापांच्या जाती समजावून सांगण्यासह साप चावल्यानंतर काय करावे, साप चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्याबाबत अर्थात सर्पदंश व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला वनविभागाच्या अधिकाºयांचे मोठे सहकार्य लाभत असल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून अनेक सापांना जीवदान मिळण्यास मदत होत आहे. वनविभागाचे सहकार्य आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या या उपक्रमामुळे आता जिल्ह्यातील विविध ठिकाणचे लोक साप घरात किंवा मानव विहार असलेल्या ठिकाणी आढळून आल्यास त्याला ठार न करता सर्पमित्रांना माहिती देत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात हजारो सापांचा जीवही वाचविण्यात सर्पमित्रांना यश आले असून, हा उपक्रम सतत चालू ठेवण्याचा संंकल्प वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्व सदस्यांनी सोडलेला आहे.
साप-मानव संघर्ष टाळण्यासाठी वन्य जीव रक्षकांची मोहिम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 6:00 PM