कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असताना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगूस घालून पेरलेले बियाणे फस्त केल्याने या शेतशिवारातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
पहिल्यांदा पेरणी करतानाच बियाणे व खताची जुळवाजुळव करताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रात ८ जूनला कारंजा तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने व त्यापुढे काही दिवस तालुक्यात पाऊस कायम राहिल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर विसंबून राहून पेरणी केली नाही. त्यानंतर काहीकाळ पावसाने दडी मारली होती. मात्र, या परिसरात आठवडाभरापूर्वी पाऊस झाल्याने पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली. परंतु पेरणी झाल्यानंतर या परिसरातील बहुतांश शेतात रानडुकरांनी हैदोस घालून पेरलेले सोयाबीन व तुरीचे बियाणे जमिनीतून उकरून फस्त केले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कामरगाव येथील शेतकरी किसनराव निकम यांनीसुध्दा आपले विळेगाव शेतशिवारातील सर्व्हे नं. ५९ मध्ये सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी केली होती. परंतु पेरलेले संपूर्ण बियाणे रानडुकरांनी उकरून खाल्ल्याने निकम यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत वन विभागाने आर्थिक नुकसान भरपाई देण्याची व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
नुकसान भरपाई दया
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.