लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभाग व जिजामाता विद्यालय पांगरी नवघरेच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राध्येशाम घुगे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण मालेगाव येथिल वनपाल चोंडकर, कदम, आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे हस्ते वृक्ष पुजन करण्यात आले. सामाजिक वनीकरण मालेगाव येथिल वनपाल चोंडकर यांनी वन्यजीव सप्ताहाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. त्यामुळे वाघांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला आक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. सध्या मोठमोठ्या वनक्षेत्रांत वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाकरिता वन्य प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. दरम्यान, यापूर्वी ४ आॅक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांना लागवडीसाठी वृक्ष देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाझुळकर यांनी, तर आभार शिक्षक बाजड यांनी मानले.
मालेगाव तालुक्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 2:52 PM