वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘अजगर वाचवा’ नावाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत मंगरुळपीर तालुक्यात जनजागृती करून अजगराचे महत्त्व पटवून देण्यासह या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जनतेला करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या फलकाचे अनावरण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक रेड्डी यांच्या हस्ते २९ मार्च रोजी वनोजा येथे करण्यात आले.
सापांच्या जातीमधील अजगर या सापाचे जैवविविधतेतील महत्त्व अनन्य साधारण आहे. अलिकडच्या काळात दुर्मिळ होत चाललेल्या अजगराचे संरक्षण आणि संवर्धन त्यामुळेच अत्यंत गरजेचे आहे. प्रामुख्याने मोठ्या आकाराचे सरपटणारे प्राणी हे अजगराचे खाद्य असून, क्वचित हरणालाही अजगर गिळतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. अजगराचे दिवसेंदिवस नष्ट होणारे अस्तित्व जैवविविधतेसाठी धोकादायक असल्याने अजगराचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या पृष्ठभूमीवर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने मंगरुळपीर तालुक्यात ‘अजगर वाचवा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी वनोजा येथे २९ मार्च रोजी सकाळी ११.३० लामेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक रेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीवरक्षक गौरव कुमार इंगळे, तसेच काटेपूर्णा अभयारण्याचे वनाधिकारी खैरनार, विशाल माळी आदिंसह वनविभागाचे सर्व अधिकारी व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी रेड्डी यांनी टीमच्या सदस्यांसोबत संवाद साधला तसेच अजगर सापाबद्दल मार्गदर्शन केले. गौरवकुमार इंगळे यांनी अजगर वाचवा हा उपक्रम काटेपूर्णा अभयारण्याजवळील गावांत अत्यंत प्रभावीपणे, तसेच व्यापक पध्दतीने राबवण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला अतुल इंगोले, चेतन महल्ले, आकाश कांबळे, अमोल सोलव, उमेश वारेकर, सौरव इंगोले, विपुल रोकडे, आदित्य इंगोले, गजानन राऊत, दिपक कुरवाडे, वैभव गावंडे, सौरव मनवर तेजस सोनोने व गावातील आणखी युवक उपस्थित होते.