साहेबराव राठोड
शेलूबाजार : राज्यभरातील जी गावे ग्रामपंचायतीसाठी पात्र आहेत; परंतु तो दर्जा अद्याप त्यांना मिळाला नाही, अशा गावांचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही तो लोकसंख्येच्या पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या पांगरी महादेव या गावाला आता तरी ग्रामपंचायतीचा दर्जा मिळणार का? १७ वर्षांचा संघर्ष फळाला येणार का? हे गाव या योगे विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अकोला जिल्ह्यातून विभाजन होत वाशिम जिल्ह्याची १ मे १९९८ रोजी नव्याने निर्मिती झाली. या घडामोडीला सध्या २३ वर्षे पूर्ण झाली. जिल्हा निर्मितीच्या पाच वर्षांनंतर पांगरी महादेव हे गावही अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात वर्ग करण्यात आले; मात्र ते कोणत्याही ग्रामपंचायतीला अद्यापपर्यंत जोडण्यात आलेले नाही. नजीकच्या तऱ्हाळा ग्रामपंचायतीकडून पांगरीतील गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात; मात्र विकासकामांच्या बाबतीत आजही पांगरी हे गाव कोसोदूर असल्याचे चित्र आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या गावाकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासंबंधी गत अनेक वर्षांपासून गावकरी पाठपुरावा करीत आहेत; परंतु या लढ्याला आजही यश आलेले नाही. आता शासनानेच नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत प्रस्ताव मागविले असल्याने जिल्हा प्रशासन तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींनी पांगरी महादेव येथील मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असा सूर उमटत आहे.
.....................
बाॅक्स :
शासकीय योजनांपासून १७ वर्षांपासून गावकरी वंचित
पांगरी महादेव हे गाव पूर्वी बार्शीटाकळी (जि. अकोला) तालुक्यातील सावरखेड ग्रामपंचातीत समाविष्ट होते. कालांतराने ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समाविष्ट झाले; मात्र गाव विकासाचे संभाव्य अंदाज पत्रक अथवा जमा - खर्च पत्रक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या १७ वर्षांपासून ग्रामस्थ शासकीय योजनांपासून वंचित आहेत.
......................
कोट :
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेकडून अमरावती विभागीय आयुक्तालयाकडे पांगरी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो १९ डिसेंबर २०१९ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाला मिळाला. तसेच ३ जानेवारी २०२० रोजी ग्रामविकास मंत्रालयास तो प्राप्त झाला; मात्र प्रश्न आजही जैसे थे आहे. किमान आता तरी पांगरीला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा, अशी आपली मागणी आहे.
- विष्णू मंजुळकर
सामाजिक कार्यकर्ते, पांगरी महादेव
.................
कोट :
पांगरी महादेव या गावाला परिसरातील अन्य ग्रामपंचायतीला जोडण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाने पूर्वीपासूनच ठोस प्रयत्न केले; मात्र त्यास अद्यापपर्यंत यश आलेले नाही. शासनस्तरावर नव्याने प्रस्ताव पाठविण्यासंबंधी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या वेळीही सकारात्मक प्रयत्न राहतील.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम