संतोष वानखडे, वाशिम : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये सकाळपासूनच धार्मिक विधी सुरु झाले. मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, वाशिम शहरासह ग्रामीण भागातही मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पाचशे वर्षाने २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्या येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वाशिमकरही राममय झाले. मालेगाव शहरातील सकल हिंदू समाज व श्री गजानन महाराज संस्थानच्या संयुक्त विद्यमाने भव्य कलश यात्रा काढण्यात आली. सकाळी ६ वाजता प्रभू श्रीराम यांच्या मुर्तिला अभिषेक, सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत महायज्ञ, ११ वाजतापासून अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मूर्ति प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर दाखविण्यास सुरूवात झाली. १२ वाजता महाआरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आले. वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र राम नामाच्या पताका तसेच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिकृती लावण्यात आलेल्या. जिल्ह्यातील मंदिरांत पहाटेपासूनच राम भक्तांची अलोट गर्दी दिसून आली. रामनामाचा जयघोष करण्यात आला.