लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले आहे. आता या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी खैरखेड्याच्या सरपंच आशा शेळके यांनी २६ मार्च रोजी केली आहे. सरपंच आशा शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार रिधोरा-राजुरा-खैरखेडा या डांबरी रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविण्यासाठी चालकांना कसरतच करावी लागत असल्याने अपघाताची भिती निर्माण झाली होती. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून तालुक्यातील एका कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीचे काम देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवातही झाली; परंतु या कामांत नियमांना बगल देण्यात आली. त्यामुळे हे काम निकृष्ठ झाले असून, या रस्त्यावर पूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे आठवडाभरातच जैसे-थे झाले आहेत. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप सरपंच आशा शेळके यांनी केला असून, या कामाची तातडीने चौकशी करून पुन्हा रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रिधोरा-खैरखेडा रस्ता दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कामात नियमांना पूर्णपणे बगल देण्यात आली आहे. त्यामुळे बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा जैसे-थे झाले असून, या कामाची चौकशी करणे आवश्यक आहे.-आशाबाई शेळके, सरपंच,खैरखेडा.