वाशिम : शेतीकामात व्यस्त असलेली ४० वर्षीय महिला आणि ७३ वर्षीय वृद्धावर रानडुकराने अचानक हल्ला चढविला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. १५ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटला घडली. त्याची वार्ता कळताच गाव परिसरात दहशत निर्माण झाली.
प्राप्त माहितीनुसार, पानविहिर येथील दिपाली किशोर डांगे (४०) ही महिला शेतीकामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत इजा झाली. त्यानंतर त्याच रानडुकराने बाजूच्या शेतात जाऊन काडीकचरा वेचणीचे काम करीत असलेल्या पिरू कालू चौधरी (७३) या वृद्धावर हल्ला केला. त्यात चाैधरी यांच्याही पायाला गंभीर ईजा झाली आहे.
दोघांच्याही कुटुंबियांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होणार केव्हा?सध्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर कुटूंबासह शेतशिवारांमध्ये कामात व्यस्त झाले आहेत. अशात दबा धरून बसलेल्या रानडुकरांकडून त्यांच्यावर हल्ला चढविण्याच्या घटना सातत्याने घडत असून हल्लेखोर वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.