- यशवंत हिवराळेराजुरा (वाशिम) : तुटपुंज्या पाण्याच्या भरवशावर बिजांकुरलेलं कपाशीच पिक वाचविण्यासाठी पतीच्या खांंद्याला खांदा लावुन शेतातील डवरणीच्या कामात विमलबाई धुरकरी बनली आहे. मोठ्या धैर्याने संसाराचा गाडा हाकणाºया विमलबाई रवाळे या रिधोरा येथील असून, इतर महिलांसाठी त्या एक आदर्श ठरत आहे.राजुरा पासुन जवळच असलेल्या रिधोरा येथील गुलाब किसन रवाळे या कुटूंबाकडे अकोला - हैद्राबाद महामार्गालगत दोन एकर शेतजमीन आहे. गत आठवडाभरापुर्वी त्यांनी या शेतजमिनीत कपाशीची लागवड केली. सद्यस्थितीत पीक चांगल्या प्रकारे बिजांकुरले असुन डवरणीला आले आहे. अशा अवस्थेत स्वत:कडे बैलजोडी नाही. औतफाटे नाहीत, शिवाय भाडेतत्वावर कुणाकडून डवरणी करायची तर गाठीशी पैसा नाही. या विवंचनेत अडकलेल्या गुलाब रवाळे यांच्या साथीला अर्धांगीणी विमुलबाई धावुन आली. तुम्ही फक्त डवरे धरा. मी कमरेला दोर बांधुन ओढण्याचे काम करतो असा सल्ला देताच पती गुलाब रवाळेंनी ही होकार देत पत्नीचा सल्ला ग्राह्य मानला. ३० जुन रोजी सकाळी शेतात दाखल होवुन सायकलच्या एका चाकावर बनविलेल्या डवºयाला दोर बांधुन प्रत्यक्ष डवरणीच्या कामाला सुरुवात केली. यातुन इतरांना डवरणीसाठी करावी लागणारी खुशामत व वाचलेला पैसा याचे मनस्वी समाधान रवाळे दाम्पत्याच्या चेहºयावर दिसुन आले.
संसाराचा गाडा हाकण्यासाठी विमलबाई बनली धुरकरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 6:21 PM