लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस’ या सामाजिक संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांसाठी ३ व ४ नोव्हेंबर या कालावधीत दोन दिवसीय महिला नेतृत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. त्यात महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या कार्यशाळेत महिलांनीच महिलांवरील हिंसाचार रोखण्याची शपथ घेऊन अन्यायाविरूद्ध लढा पुकारण्याचा निर्धार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेला नागपूर खंडपिठाचे अॅड. डॉ. मोहन गवई, विधी महाविद्यालय, औैरंगाबादचे माजी अध्यापक अॅड. हिरामन मोरे, अॅड. दिपाली सांबर, अॅड. संगीता गायकवाड, अॅड. आर.एन. कांबळे, डॉ. एम.बी. डाखोरे, एनडीएमजेचे मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके, हिंगोली जिल्हा सचिव दलित दिपके, अब्दुल हाफीज, राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.यावेळी उपस्थित प्रशिक्षाणार्थी महिलांनी प्रशिक्षणाचा वृतांत प्रभावीपणे मांडला. उच्च न्यायालय औरंगाबादचे अॅड. सिद्धार्थ ऊबाळे व पी.एस. खंदारे यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पास्को) या विषयावर, तर जिल्हा व सत्र न्यायालय, बुलडाणाच्या विधिज्ञ अॅड. ऋचिता जाधव, एनडीएमजे विदर्भ विभागीय सचिव भारत गवई यांनी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार व अश्लिलता विरोधी कायदा या विषयावर आणि सेवानिवृत्त नियोजन अधिकारी डॉ. डाखोरे व कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिकारी बी.बी. धनगर यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा यावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी महिला नेतृत्व विकास कार्यशाळेसंदर्भात मौलिक माहिती दिली. यावेळी महिलांवर हिंसाचार होणार नाही, या आशयाची सामुहिक शपथ घेऊन दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.
महिलांनी घेतली महिलांवरील हिंसाचार रोखण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 3:23 PM