वाशिम : काेराेना संसर्गामुळे प्रशासनातर्फे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नियमांचे पालन व्हावे याकरिता पाेलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रदिवस मेहनत घेत आहेत. यामध्ये लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत महिला पाेलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने संपूर्ण जिल्हा वेठीस धरला आहे. जिल्ह्यातील एकही गाव यापासून सुरक्षित राहिलेले नाही. दरम्यान, संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत संकट अधिकच गंभीर हाेत असून तिसरी लाट येणार असल्याचे आराेग्य विभाग अंदाज वर्तवित आहे. काेराेना संसर्गाच्या नियमांचे पालन व्हावे, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना मज्जाव करावा यासाठी शहरातील चाैकाचाैकात पाेलीस कर्मचारी दिसून येत आहेत. यामध्ये महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचाही वाटा माेठ्या प्रमाणात आहे. घरदार दूर करून कर्तव्य बजावणाऱ्या महिला घरसंसार करीत कसे कर्तव्य बजावितात, त्यांच्या पाल्यांना काय वाटते, यासंदर्भात ‘लाेकमत’ने घेतलेला आढावा. प्रशासनाने निर्धारित करण्यात आलेल्या वेळेनंतर रस्त्यावरून फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाैकशी चाैकाचाैकात महिला पाेलीस कर्मचारी करताना दिसून येत आहे. अनेक जण वादसुद्धा घालण्याचा प्रयत्न करीत असले तरीसुद्धा माेठ्या हिमतीने कार्य पार पाडत आहेत. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळत असलयाने व करीत असलेल्या कार्याचे काैतुक हाेत असल्याने बळ मिळत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी अभिमानाने सांगतात.
.........................
कुटुंबाची काळजी मोबाइलवरूनच
कर्तव्य बजावून आल्यानंतर सर्वात आधी गरम पाण्याने आंघाेळ करून परिवारात गुंतताे. कर्तव्यावर आल्यानंतर भीतीही वाटते; परंतु खबरदारी घेतल्या जात असल्याने काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी बजावलेल्या कर्तव्याचा आनंदही हाेताे.
-स्वीटी काेकडवार, महिला पाेलीस
...........
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी पाेलीस कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तरी शहरात काही नागरिक विनाकारण फिरत आहेत. नागरिकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी पाेलिसांना मदत करणे गरजेचे आहे. सर्वांन मिळून काेराेना हद्दपार करणे गरजेचे आहे.
-प्रियंका लाटे, महिला पाेलीस
............
काेराेनाचे आलेले नवे संकट व त्यापासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता मिळालेल्या कर्तव्याचा आनंद वाटताे. कुटुंबापासून थाेडे दूर झाले असले तरी माेबाइलवर संभाषण केल्या जाते. कर्तव्य बजावतांना कुटुंबाची साथ लाभत आहे.
-सुषमा अवचार, महिला पाेलीस
.............
आई जेव्हा बाहेर ड्यूटी करण्यास जाते तेव्हा मला काळजी वाटते. ती ड्यूटीवर जाताना मला सर्व सूचना देऊन जाते. तसेच अधून-मधून माेबाइलवर मी काय करीत आहे, याची विचारणा करते. माझी आई खूप चांगले कार्य करीत असल्याचा अभिमान वाटताे.
-अर्णव वाघ
..........
काेराेना संसर्ग पाहता सर्वांनी पुढाकार घेऊन त्यांना हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे; परंतु सर्व ताण पाेलिसांवरच दिसून येताे. माझी आई कधी दिवसा तर कधी रात्रीपर्यंत ड्यूटीवर राहत आहे. घरचे सर्व काम आटाेपून कर्तव्य बजावणारी माझी आई ‘ग्रेट’च.
-श्रावस्ती अवचार
.............
काेराेना नियमांचे पालन करण्यासंदर्भात आई नेहमीच मला सांगतेय. तसेच काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही आई दंड करतेय. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास पाेलिसांना मदत हाेईल. आई कर्तव्यावर असताना पप्पा लक्ष ठेवतात.
-वेदांत काेकडवार
.............
एकूण पोलीस अधिकारी ८९
महिला पोलीस अधिकारी १५
एकूण पोलीस १३९८
महिला पोलीस २०३