वाशिम - चार प्रकारची वैद्यकीय देयके काढण्यासाठी २० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाच्या सहायक लेखाधिकारी (वर्ग दोन) सीमा स्वप्नील वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षात सहायक लेखाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सीमा स्वप्नील वानखेडे (३०) यांच्याकडे लेखाधिकारी वर्ग एक या पदाचादेखील अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदाराच्या मुलाची चार प्रकारची वैद्यकीय देयके काढून देण्यासाठी वानखेडे यांनी प्रत्येकी पाच अशी एकूण २० हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदाराच्या मुलाची वॉल नसल्यामुळे हैद्राबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी अमरावती, नागपूर येथे उपचार केला होता. सदर उपचाराची एकूण चार वैद्यकीय देयके जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथून मंजूर झाल्यानंतर सदर देयके जिल्हाधिकारी कार्यालय येथे आली. एकूण चार वैद्यकीय देयकाची चार लाख २६ हजार रुपयाची रक्कम काढण्यासाठी लेखाधिकारी वानखेडे यांनी देयकात त्रुटी असल्याचे सांगून देयक काढण्यास टाळाटाळ केली तसेच २० हजार रुपयाची मागणी केली, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची पडताळणी कार्यवाही केली असता, २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पंचासमक्ष चार वैद्यकीय देयकासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली. यावरून २० मार्च ते २१ मार्च २०१८ दरम्यान सापळा कारवाई केली असता वानखेडे यांना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तथापि, २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पंचासमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने २२ मार्च रोजी वानखेडे यांना ताब्यात घेतले असून, वाशिम शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एन.बी. बोºहाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कर्मचारी नंदकिशोर परळकर, नितीन टवलारकर, अरविंद राठोड आदींनी केली.