मुंगळा (जि. वाशिम): गावातून दारू हद्दपार करण्यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला असून, स्वत: दारू पकडून देण्याचे पाऊल आता महिलांनी उचलले आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे गावठी दारूचा महापूर आहे. यामुळे शालेय विद्यार्थीदेखील मोठय़ा संख्येने दारूच्या आहारी जात असल्याने महिलांची डोकेदुखी वाढली आहे. दारूमुळे संसारात कलह निर्माण होत आहेत तसेच दारूड्यांमुळे किरकोळ भांडणेही होतात. परिणामी, गावाच्या शांततेला बाधा पोहोचत आहे. या कटकटीतून एकदाची सुटका घेण्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या आणि दारूबंदीचा एकमुखाने निर्णय घेतला. महिलांनी सुरुवातीला मालेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली. पोलीस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून एकप्रकारे दारू व्यावसायिकांना अभय दिले. शेवटी स्वत: दारू पकडून देण्याचे पाऊल महिलांनी उचलले आहे. दोन दिवसांपूर्वी महिलांनी प्लास्टिक पिशवीमध्ये विकत असलेली दारू पकडून ती पोलीस पाटलांच्या स्वाधीन केली. पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनाला माहिती देऊन दारूप्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली. दारूविक्रेत्याविरूद्ध यावरून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दारूबंदीसाठी सकारात्मक सहकार्य करावे, अशी विनवणी महिलांनी केली आहे.
दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार
By admin | Published: September 04, 2015 1:29 AM