मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचन प्रकल्प यावर्षी अर्धवट भरले. नागरिकांना नगरपरिषद प्रशासन पाणी देण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने शेकडो महिलांसह नागरिकांनी २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजता नगरपरिषदेवर मोर्चा नेवून आपला रोष व्यक्त केला. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण कोरडे पडले असून, सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. परंतु तेथूनही पाणी मिळेनासे झाले आहे. शहरातील पाणी टंचाई दिवसेंदिवस अधिकच भीषण होत आहे. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. शहरातील विहिरी, कुपनलिका, कोरड्याठाक पडल्या आहेत. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना प्रशासनाला काही सोयरसुतक नसल्याने शहरवासीयात तीव्र संताप व्यक्त करीत नगरपरिषदेवर मोर्चा नेवून पाणी देण्याची मागणी केली.
मंगरुळपीरात पाणी प्रश्न पेटला; नगरपरिषद कार्यालयावर महिलांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 1:53 PM