लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील भुली येथे अवैध दारुविक्री जोमात सुरू असून दारूड्या पतीच्या त्रासाला महिला कंटाळल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी गावातील महिलांनी ९ जुलै रोजी एकत्र येवून पोलिस स्टेशनवर धडक दिली.भुली येथील महिलांनी यासंदर्भात पोलिस प्रशासन व तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की भुली येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारूच्या आहारी गेलेले पती त्यांच्या पत्नीच्या मजूरीचे पैसेही हिसकावून घेवून जात असल्याचे प्रकार घडत आहेत. तथापि, गावातील अवैध दारुविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, यासाठी भुली येथील सरपंच सुनील शिंदे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, पोलिस पाटील छाया डहाके यांच्यासह बचत गटाच्या महिला शोभा शिंदे, वच्छला ठाकरे, सत्वा जाधव, दुर्गाबाई राठोड, लक्ष्मी शिंदे, चंद्रकला शेलकर, वेणुबाई जाधव, सुनिता पवार आदिंनी पोलिस स्टेशनवर धडक दिली.पोहरादेवी बिटमध्ये दारूचा महापुर!मानोरा तालुक्यातील पोहरादेवी बिटमध्ये दारूचा अक्षरश: महापुर असून अनेकजण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्याच्या मागणीसाठी वडगाव येथील संतोषीमाता महिला बचत गट, विठोली येथील तंटामुक्ती अध्यक्ष, कारखेडा येथील महिलांनी दारुबंदीसाठी यापूर्वी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केली. भुली येथील महिलांनी देखील आता एल्गार पुकारला असून पोलिसांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.
दारूबंदीसाठी महिलांची पोलिस स्टेशनवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:40 PM