या शेती शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी ही प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यामध्ये कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच उमेद अभियानाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली व या शेती शाळेमध्ये त्या सहभागी झाल्या. दर शुक्रवार व रविवारला सकाळी ११ वाजता पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब पेजवर ऑनलाइन शेतीशाळा घेण्यात येते. त्यामध्ये या सर्व महिला व शेतकरी सहभागी होतात.
या शेतीशाळेमध्ये पानी फाउंडेशनने सोयाबीन या विषयावर सात प्रकारचे व्हिडिओ तयार केले आहेत. हे सर्व व्हिडिओ पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब तसेच फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. या डिजिटल ऑनलाइन शेती शाळेकरिता कारंजा लाड तालुक्यातून ३७०४ व मंगरूपीर तालुक्यातून १९४७ एवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून ४६ हजार शेतकऱ्यांनी या ऑनलाइन शेती शाळेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांचे पानी फाउंडेशनने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेले आहेत. या ग्रुपवर शेतकरी प्रश्न विचारू शकतात, आपल्या समस्या मांडू शकतात, तसेच त्यांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुद्धा या ग्रुपवर शेतकऱ्यांना दिले जाते. तसेच शेतकऱ्याकडून आलेल्या प्रश्नावर लाइव्ह कार्यक्रमांमध्ये चर्चासुद्धा केली जाते. आकर्षणाची विशेष बाब म्हणजे आमिर खान यांच्यासोबत ऑनलाइन शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय सहसंचालक अमरावती तोटावार सुद्धा लाइव्ह उपस्थित असतात.