वाशिम : स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत जिल्ह्यातील २१२ कुटुंबांच्या शौचालयांची कामे खोळंबली असून ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी दिले.स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत जानेवारी- २०२१ मध्ये जिल्ह्यात एकूण तीन हजार नवीन शौचालयांचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. कोविड-१९ मुळे शौचालय बांधकामाला विलंब झाला. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासनाचे अनुदान तातडीने मिळावे याकरीता सहा महिन्यांपासून संबंधित गावांचा निधी तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण होऊन संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधी वितरित करण्यात आला. कोरोनाकाळात बांधकामे प्रभावित झाली होती. मध्यंतरी शौचालयाची कामे मोठ्या संख्येने अपूर्ण राहिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित ग्रामसेवकांची सुनावणी घेतली तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे व चमूकडून आढावाही घेतला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता बांधकामाला वेग येत असल्याचे दिसून येते. अद्याप २१२ शौचालयांची कामे अपूर्ण आहेत. यामध्ये रिसोड व वाशिम तालुक्यातील अपूर्ण कामांचा सर्वाधिक भरणा आहे.
वाशिम जिल्ह्यात २१२ शौचालयांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 4:30 PM