अकोला : आयएल अॅण्ड एफ एस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे बांधकाम रखडलेले आहे. रखडलेले बांधकाम पुन्हा तातडीने सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली जोरात आहेत. कंपनीसोबत वेगवेगळ्या स्तरावर वाटाघाटी झाल्या असून, हा प्रकल्प लवकर सुरू केल्या जात असल्याचे संकेत आहेत.अमरावती ते चिखली चौपदरीकरणाचे काम आयएल अॅण्ड एफ एस कंपनीकडे होते. या कामासोबतच देशातील अनेक मार्ग बांधकामांचे कंत्राट या कंपनीकडे आहे. कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने देशभरातील सर्व बांधकाम थांबवून आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे विकसित होत असलेले सर्व प्रकल्प अर्ध्यांवरच थांबले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे आणि एलआयसीचे शेअर असल्याने अनेक कंपन्या अडचणीत आल्या आहेत. रखडलेल्या प्रकल्पामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने आता सरकारने दबाव आणून रखडलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. कंपनीवर दबाव आल्याने कंपनीने सरकारसोबत काही तडजोड स्वीकारली असून, काही महत्त्वाचा भाग कंपनीने विक्रीला काढल्याचे समजते. यासोबतच राज्य शासनाने रखडलेले प्रकल्प आहे त्या स्थितीत हातात घेण्याची तयारी दर्शविली आहे. या दोन्ही प्रस्तावास कंपनीने संमती दिली असल्याने रखडलेले प्रकल्प सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कंपनीच्या संचालक आणि सरकारच्या बैठका वाढल्या असून, त्यामध्ये काही महत्त्वाचे करारही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी २६ डिसेंबरच्या बैठकीत या प्रकल्पास पूर्णरूप दिले जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत; मात्र अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. विविध प्रकल्पांसंदर्भात २६ डिसेंबर रोजी कें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मीदेखील जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी २६ माहिती मिळण्याची शक्यता आहे.-विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख, चौपदरी महामार्ग विभाग अमरावती.