आमदार राजेंद्र पाटणी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रुई (गोस्ता) परिसरातील पूस नदीवर सिमेंट बंधारा उभारण्यात येत आहे. त्यासाठी २ कोटी ६४ लाख ९ हजार ८२५ रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी हे काम शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. रुई, गोस्ता, इंगलवाडी, वटफळ, मेन्द्रा, हिवरा येथील शेतकऱ्यांना सिमेंट बंधाऱ्यामुळे सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे; मात्र संबंधित मूळ कंत्राटदाराने इतर काही लोकांना काम तोडून दिले. अनुभवहीन असलेली ही मंडळी मात्र अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने नियमानुसार काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. दर्जाहीन कामामुळे बंधारा भविष्यात किती काळ टिकेल, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कामाला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. बेसमेंटच्या कामात योग्य बंधकाम साहित्य वापरले नसून खोदकाम नियमानुसार करण्यात आलेले नाही. परिणामी, काम सुमार दर्जाचे होत आहे. जलसंधारण उपविभाग कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
......................................
कोट :
रुई गोस्ता परिसरातील अधिकांश शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. सिंचनाची कुठलीही प्रभावी सुविधा नाही. यामुळे शेतीदेखील पिकत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशात मोठी धरणे बांधणे शक्य नसल्याने आमदार पाटणी यांच्या प्रयत्नातून बंधारे मंजूर झाले. त्यातही भ्रष्टाचार केला जात आहे.
- गजानन चक्रावार
सरपंच, रुई
............................
रुई येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम नियमानुसारच व्हायला हवे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिल्यानंतर आपण स्वत: बांधकामस्थळी पोहचून पाहणी केली. काही काम व्यवस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते दुरुस्त करून घेतले. पुढील काम दर्जेदार करण्याच्या सूचनाही कंत्राटदारास दिल्या आहेत. काम नियमानुसार झाले नाही तर देयके मंजूर केली जाणार नाही.
- एस.एम. शिंदे
उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मंगरूळपीर