लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गत १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी असताना शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यामुळे संतापलेल्या कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला असून १८ मे रोजी काळी फित लावून; तर १९ मे पासून ‘मी १५ वर्षांपासूनचा दुर्लक्षित कर्मचारी’ची फीत लावून कंत्राटी कर्मचारी कामकाज करित असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भातील निवेदनात नमूद आहे, की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे सेवा दिली. कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. त्यातही प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यात येत आहे. दरम्यान, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे समकक्ष पदांवर बिनशर्त समायोजन करावे, अशी मागणी होत असताना शासनाने आतापर्यंत आश्वासनांशिवाय काहीच केले नाही. त्यातच आता १७०० कायमस्वरुपी पदे भरण्याची तयारी चालविल्याने कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरासह वाशिम जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक मार्ग स्विकारला असून १९ ते २५ मे या कालावधीत ‘मी १५ वर्षांचा दुर्लक्षित कंत्राटी कर्मचारी, माझ्या अनुभवाचा, सेवेचा व शिक्षणाचा विचार करा’, असे नमूद असलेली फित लावून कामकाम करणे, २६ मे रोजी एकदिवसीय लाक्षणिक बंद, त्यानंतर आॅनलाईन व आॅफलाईन रिपोर्टींग बंद करणे, २८ मे पासून कोव्हीड रुग्णसेवा वगळता इतर सर्व कामे बंद व कामावर असताना बेमुदत उपोषण करण्यासह पुढेही आंदोलने केली जाणार आहेत, असे कळविण्यता आले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ‘मी १५ वर्षांपासूनचा दुर्लक्षित कर्मचारी’ची फीत लावून कामकाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 4:11 PM