वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही. तुरीच्या शेंगा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणा-या तुराट्या आजही अनेक शेतांमध्ये तशाच दिसून येत आहेत. तथापि, नैसर्गिक आपत्तीसह उद्भवलेल्या विविध स्वरूपातील संकटांमुळे शेतकरी अक्षरश: जेरीस आल्यानेच आगामी खरिप हंगामात पेरणीचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काडी-कचरा वेचणे, वखरणी, नागरणी, कोळपणी यासह इतर स्वरूपातील शेत मशागतीची कामे सुरू होतात. यंदा मात्र जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरणीलायक क्षेत्रावर ही कामे सुरू झालेली नाहीत. गत महिन्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतक-यांच्या गहू, हरभरा व काही प्रमाणात तुरीचे अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसून शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीचाही विशेष फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम आगामी खरिप हंगामावर जाणवण्याची शक्यता असून जवळ पैसाच नसल्याने शेत मशागत आणि पेरणीसाठी लागणा-या साहित्यांची जुळवाजुळव कशी करणार, असा प्रश्न शेतक-यांसमोर उपस्थित झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात शेत मशागतीची कामे प्रलंबित !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 5:13 PM