कारंजा तालुक्यातील धनज बु. येथूनच जवळ असलेल्या हिंगणवाडी ते रामटेक या ४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झाले. त्यानंतर निविदा प्रक्रिया पार पडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि हे काम अर्धे पूर्णही झाले; परंतु कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर सर्व कामे बंद पडली. त्यात हिंगणवाडी ते रामटेक या रस्त्याच्या कामाचाही समावेश होता. तथापि, शासनाने लॉकडाऊन शिथिल करून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याची मुभा दिली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसह इतर विकासकामे सुरुही झाली. त्यामुळे हिंगणवाडी ते रामटेक या रस्त्याचे काम सुरू होणेही अपेक्षित होते; परंतु आता लॉकडाऊन पूर्णपणे हटविल्यानंतरही या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे चालकांना अर्धवट रस्त्यावर वाहन चालविताना कसरती कराव्या लागत आहेत. त्यात दुचाकी घसरून चालकांना किरकोळ दुखापती होण्याचे प्रकारही घडत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत, अशी मागणी होत आहे.
हिंगणवाडी-रामटेक रस्त्याचे काम आठ महिन्यांपासून अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:41 AM