मालेगाव: येथे मंजूर झालेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम गत साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमींचा हिरमोड होत असून, क्रीडा विभागाने लक्ष द्यावे असा सूर खेळाडूंमधून उमटत आहे.
विद्यार्थी, युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने मालेगाव नजिक नागरदास येथे तालुका क्रीडा संकुलाला मंजूरात मिळाली. तत्कालिन मंत्री स्व. सुभाषराव झनक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता तसेच तत्कालीन सरकारकडून निधीही मंजूर करून घेतला होता. मालेगाव परिसरात जागा उपलब्ध नसल्याने शहरानजीक असलेल्या नागरतास येथे क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात आली. क्रीडा संकुलाचे काम सुरुवातीला २ वर्षे जागेअभावी रखडले होते. त्यानंतर क्रीडा संकुलासाठी नागरदास येथील ई-क्लासमधील जागा देण्यात आली. जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होईल असे वाटत होते; परंतु केवळ कुंपणभिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा क्रीडा संकुलाची उभारणी रखडली. तब्बल साडेतीन वर्षांपासून हे काम रखडले आहे. क्रीडा संकुलावरील २०० मीटर धावपट्टीसह कबड्डी, खो-खो आणि इतर मैदानी खेळांच्या मैदानांचे काम पूर्ण कधी होणार? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.