महामार्गावर वाहन तपासणी
दगड उमरा : वाशिम तालुक्यातील वाशिम ते पुसद महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यात शनिवारी नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच कागदपत्रे न ठेवल्याप्रकरणी ५० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाशिम-केकतउमरा रस्त्याची दुर्दशा
वाशिम : वाशिम येथून केकत उमरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने गटारे तयार झाली आहेत.
तलाठ्याचे पद पाच महिन्यांपासून रिक्त
इंझोरी : इंझोरी सजातील तलाठ्याचे पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. येथील प्रभार इतर ठिकाणच्या तलाठ्याकडे दिला आहे. ते नियमित गावात येत नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांची कामे खोळंबत आहेत. तलाठ्याचे पद तात्काळ भरावे, अशी मागणी पोलीस पाटील नंदकिशोर तोतला यांनी केली आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बांबर्डा कानकिरड : येथे शेतकऱ्यांना सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांची उपस्थिती होती.
राजकीय वातावरण तापले
पिंपळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ओबीसी प्रवर्गातील पदे रद्द करण्यात आल्याने या पदाच्या निवडणुका पुन्हा होणार आहेत. याकरिता ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी
मालेगाव : येथून वाशिमकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून वाहतूक विस्कळीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत
वाशिम : काही महिन्यांपूर्वी गावात पाणीपुरवठा अधूनमधून विस्कळीत होत होता. ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी अडचणी दूर करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने ग्रामस्थांची सोय झाली.