वाशिम : गावाचा विकास साधायचा असेल तर गावकरी व प्रशासन यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे गावाच्या समृद्धीसाठी कोण-कोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, याचे काळजीपूर्वक नियोजन करून सदर कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी केले. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने बोरव्हा बु. येथे आयोजित विविध यंत्रणांच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, पानी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता, गावाच्या विकासासाठी काम करण्याची एक संधी म्हणून पाहावे. या स्पर्धेत किती क्रमांकाचे बक्षीस मिळते, यापेक्षा आपले गाव आणि गावातील नागरिकांचा विकास कसा करता येईल, हे ध्येय समोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून गावामध्ये नक्कीच समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, आतापर्यंत आपण मृद आणि जलसंधारणाच्या कामांमधून पाणी साठविण्यासाठी अनेक कामे केली आहेत. पण आता या पाण्याचा योग्य वापर करून आपले उत्पन्न अशाप्रकारे वाढेल, याचे नियोजन प्रत्येकाने करावे. तसेच रोप लागवड, पूरक व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावे, असे आवाहन केले.हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत रोजगार हमी योजनेतून करावयाची अभिसरणाच्या कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. त्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे, अशा सूचना केल्या. यावेळी तोटावर, डॉ. पोळ यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करा ! - शण्मुगराजन एस.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 5:20 PM