मानोरा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस लोककल्याणासाठी काम करीत आहे. सध्या राज्यात व जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.
मानोरा येथे १८ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, अरविंद पाटील इंगोले, सुनील धाबेकर, चक्रधर गोटे, विशाल सोमटकर, जावेद सौदागर, भाऊ नाईक, सुरेंद्र देशमुख, प्रकाश राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील तरोडकर, राजू चौधरी उपस्थित होते.
काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे आवाहन यावेळी झनक यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. भाऊ नाईक, अरविंद पाटील, दिलीप भोजराज, सरनाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इप्तेखार पटेल यांनी केले. संचालन संतोष ढळे यांनी केले. डॉ. अशोक करसडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल तरोडकर, दिनेश मोरे, रामनाथ राठोड, वसंता भगत यांनी पुढाकार घेतला.