लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मडाण नदीच्या विस्तारासाठी सुरू असलेल्या उपनाल्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पूर्वी बुजलेला हा नाला खोदल्याने गावात पाणी शिरण्याची समस्या मिटणार असून, परिसरातील १२ गावच्या ग्रामस्थांत या कामामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा ते पिंपळखुटा अशी १२६०० मीटर अंतराच्या मडाण नदीचे पात्र गाळ साचून, झुडपे वाढल्याने बुजत चालले आहे. त्यातच या नदीला जोडणारे १३ उपनालेही बुजले होते. त्यामुळे पूर्वी सिंचनाखाली असलेल्या भागातील शेतकरी केवळ पावसावर विसंबला होता. मानवच नव्हे तर पशु-पक्षी, प्राण्यांवरही परिणाम होताना दिसत होते. विशेष म्हणजे मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस मडाण नदी खोºयात पडतो. पण नदी बुजल्याने पाणी थांबत नव्हते आणि उन्हाळ्यात या परिसरातील गावात पिण्याच्या पाण्यासाठी मारामार सुरू झाली होती. या नदीच्या भरवशावरच कधी काळी तालुक्यात सर्वाधिक दूग्ध उत्पादनासह मत्स्य व्यवसायही होत असे; परंतु केवळ नदी अरूंद व उथळ झाल्याने शेतकरी, शेतमजुरांचा जोडधंदा हिरावल्या गेला. त्यामुळे तालुक्यातील १३ गावांसाठी उपयुक्त ठरू शकणाºया या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. जलचळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णीही यांनी पुढाकार घेतला. त्यावर डिसेंबर २०१८ मध्ये लोकनेते लक्ष्मीकांत महाकाळ यांनी येथे जलतज्ज्ञांना आमंत्रित करून मडाण परिषद घेतली. नागपूर येथील एका नामांकित जलसिंचन संस्थेने या नदीच्या खोलीकरण, विस्तारीकरणाचा आराखडाही तयार केला आणि तो आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितिन गडकरी यांनीही याबाबत शासनाकडे शिफारस केली होती. आता बीजेएसच्या पुढाकाराने हे काम सुरु झाल्याने १२ गावांतील ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण आहे.
मानोली येथील मडाण नदीच्या उपनाल्याचे काम युद्ध पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:18 PM