ऑक्टोबर २०११ मध्ये ‘नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या नावाने अमलात आलेल्या प्रकल्पांतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना १०० एमबीपीएस स्पीडने इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. मात्र, २०१४ पर्यंत याअंतर्गत विशेष कामे झाली नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने २०१५ पासून ‘एनओएफएन’चे ‘भारत नेट’ असे नामकरण करून कामे हाती घेतली. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात देशभरातील एक लाख ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्यात शासनाला यश मिळाले.
नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करून मार्च २०१९ पर्यंत देशभरातील उर्वरित दीड लाख ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्याचे ध्येय बाळगण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश असून, विदर्भातील वाशिम आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये विद्युत खांबांवरून, तर अन्य जिल्ह्यांमध्ये भूमिगत केबल टाकली जाणार आहे. मात्र, विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
..................
कोट :
‘भारत नेट’ प्रकल्पात विदर्भातील दोन जिल्ह्यांचा समावेश असून, वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ३४६ ग्रामपंचायतींना ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडले जात आहे. याअंतर्गत ९० टक्के कामे पूर्ण झाली असून, लवकरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- शेख जुनेद
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, भारत नेट, वाशिम