वाशिम: विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. सदर कामे मजुरांचा अभाव असल्याने रखडली असल्याचा दावा प्रशासनाने केला.मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.वाशिम जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा लक्षात घेता, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून राबविला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची जोड मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. यापूर्वी दिलेल्या सिंचन विहिरींपैकी जवळपास ९६४६ कामे अपूर्ण आहेत. तसेच सन २०१६-१७ या वर्षात मंजूर असलेल्या ४४४८ पैकी आतापर्यंत केवळ १०५५ विहिरींच्या कामांना सुरूवात होऊ शकली. विशेष म्हणजे या विहिरींच्या निवडीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही बरेच वादंग झाले होते. लाभार्थी निवडीवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. लाभार्थींची निवड पंचायत समिती स्तरावरून की ग्रामसभेतून या मुद्यावरून बरेच चर्चा झाली होती. शेवटी ४४४८ लाभार्थींची निवड ईश्वरचिठ्ठीतून करण्यात आली. आता यापैकी १०५५ विहिरींची कामे सुरू आहेत. मजूरांचा अभाव असल्याने उर्वरीत विहिरींची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी मजुरांची गरजसिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच नव्याने मंजूर विहिरींच्या कामाला सुरूवात होण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांनी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात रोजगारासाठी नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृती आराखड्यातील विहिरींचाही विचार व्हावा !सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेतून रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींनादेखील आता मान्यता देऊन कामांना सुरूवात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
विहिरींची कामे ठप्प !
By admin | Published: April 27, 2017 12:30 AM