वाशिम : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना ‘हयात’ प्रमाणपत्राविषयी इत्यंभूत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आता जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रत्येक तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २६ आॅक्टोबरपासून या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्र कोषागार नियमाच्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षाच्या १ नोव्हेंबर रोजी राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना ‘हयात’ असल्याचे प्रमाणपत्र नोव्हेंबर अखेर कोषागार अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे. बरेच निवृत्तीवेतन धारक हे बँकेत हयातीचे प्रमाणपत्र सादर करातात व बँक ती सर्व प्रमाणपत्रे जमा करुन कोषागारात सादर करतात. परंतु सदर कार्यवाहीत बरेच निवृत्तीवेतन धारकांचे प्रमाणपत्रे गहाळ होतात व ते हयातीचे प्रमाणपत्रे कोषागारापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे निवृतीवेतन धारकांना पुन्हा कोषागारात येवून हयातीचे प्रमाणपत्रे देवून निवृतीवेतन सुरु करावे लागते. या कार्यवाहीत बराच वेळ लागत असल्याने निवृत्तीवेतन धारकास आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो. त्याअनुषंगाने शासनाने जीवन प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) उपलब्ध करुन दिले आहे. या ‘डीएलएस’ (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) मशीनद्वारे निवृत्तीवेतन धारकास स्वत:चे हयातीचे प्रमाणपत्र सादर कराता येईल. या ‘डीएलएस’ (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) मशीनची माहिती देण्याकरीता निवृत्तीवेतन धारकांची मार्गदर्शक कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेली आहे.२६ आॅक्टोंबर २०१७ रोजी कारंजा येथे सकाळी १० वाजता तर मानोरा येथे दुपारी १ वाजता व मंगरुळपीर येथे सायंकाळी ४ वाजता, २७ आॅक्टोंबर रोजी रिसोड येथे सकाळी १० वाजता तर मालेगाव येथे दुपारी २ वाजता आणि ३० आॅक्टोंबर रोजी कोषागार कार्यालय वाशिम येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी आपणास जवळ असलेल्या कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयात हजर राहुन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शां.तु. गाभणे यांनी बुधवारी केले.