लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोवर, रुबेला लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली जाणार असून, या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन म्हणून ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात मॅरेथॉन कार्यशाळा पार पडली.लहान मुलांना होणारा गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. सरकारने २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. याअंतर्गत राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या सुक्ष्म नियोजनासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात तालुका व जिल्हास्तरावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. शनिवारी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांच्यासह मान्यवरांनी या कार्यशाळेला संबोधित केले. १४ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहिम किमान ४ ते ५ आठवड्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटात गोवर रुबेलाची प्रकरणे आढळुन येत असल्याने या वयोगटातील बालकांना गोवर रुबेला लसीचा १ ला डोज देण्यात येईल. सुरुवातीचे २ आठवडे प्रत्येक अंगणवाडी, शाळेतील लाभार्थ्यांना डोज देण्यात येईल. त्यानंतर शाळेत न जाणाºया लाभार्थ्यांकरिता २ आठवडे व ५ व्या आठवड्यात उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना डोज देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून ही लस घेतल्यानंतर लाभार्थीचा गोवर रुबेला या दोन्ही आजारापासून बचाव होणार आहे, असे डॉ. आहेर, डॉ. मेहकरकर यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सुक्ष्म नियोजन केले जात असून यामध्ये खासगी डॉक्टरांच्या संघटनांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. आयएमएम, आयपीए आणि निमा या संघटनेने रुबेला लसीकरण मोहिमेदरम्यान १०० टक्के सहकार्य करण्याचे पत्र आरोग्य विभागाला दिले आहे.
वाशिम येथे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 1:07 PM