लोकमत न्यूज नेटवर्कपोहा: वॉटर कप स्पर्धेत पोहा येथील गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. या गावातील सदानकदा कोरड्या राहणाऱ्या उमा, केदार नद्यांचे पात्र आता पाण्याने भरले आहे. याचा उत्सव साजरा करण्यासाठी पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले. हभप विलास महाराज यांनी जलपुजन विधीचा कार्यक्रम सांभाळला.गेल्या काही वर्षांतील अवर्षण, तसेच कचऱ्यामुळे पोहा येथील उमा आणि केदार या दोन्ही नद्यांचे पात्र बुजत चालले होेते. परिणामी पावसाळ्यांतही या पात्रात पाणी थांबेनासे झाले होते. त्यामुळेच गावातील जलपातळीत चिंताजनक घट होऊन गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या लक्षात घेत सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी वॉटर कप २०१८ च्या स्पर्धेत गावाची नोंदणी केली आणि गावातील वॉटर हिरोंना प्रशिक्षणासाठी पाठविले. ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावांत श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. यात उमा आणि केदार नदीच्या पात्राचेही खोलीकरण करण्यात आले. या कामांची चांगलीच फलश्रृती झाली असून, गावातील विहिरी, कूपननलिकांची पातळी कमालीची वाढलीच शिवाय उमा आणि के दार नद्यांचे पात्रही दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली. या जलक्रांतीचा उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी नद्यांच्या जलपुजनाचा कार्यक्रम घेतला. डॉ. विनोद चव्हाण, राजू आसरकर, अनिस बागवान यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सरपंच व जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांच्या हस्ते नद्यांचे जलपुजन करून घेतले. यानंतर सरपंच व जि. प. सदस्यांसह वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाऱ्यांचा गावकऱ्यांकडून सत्कारही करण्यात आला. यावेळी उपसरपंच ललिता तायडे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर दहातोंडे, महेंद्रा होले, चंद्रकांत राठोड, कुलदीप अवताडे, वंदना खुरसडे, वर्षाताई पवार, द्वारकाबाई वडते, बाळासाहेब दहातोंडे, लक्ष्मण ढोकणे, मधुकर ढवळे, अशोक जोगदंड, ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, माजी सरपंच अशोक अरक, मोतीराम तोरकडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन ढोकणे, अंबादास अळसपुरे यांच्या महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्रमदानातील कामाची फलश्रृती : पोहा येथील उमा, केदार नद्यांचे जलपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 4:26 PM
पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले.
ठळक मुद्देसरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि जि.प. सदस्या मंदा दहातोंडे यांनी नद्यांच्या जलपुजनाचा कार्यक्रम घेतला. वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाऱ्यांचा गावकऱ्यांकडून सत्कारही करण्यात आला.