वाशिम, दि. 3-विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी अधिकारी व कर्मचार्यांनी सोमवारपासून बेमुदत 'लेखणी बंद' चे हत्यार उपसले आहे. परिणामी, कामकाज ठप्प पडले आहे.जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी या पदास वर्ग दोनचा दर्जा देण्यात यावा, विस्तार अधिकारी (कृषी) यांना विस्तार अधिकारी पंचायत प्रमाणे वर्ग दोनची पदोन्नती मिळावी, याबाबतच्या प्रस्तावासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रस्ताव ग्रामविकास विभाग व कृषी विभागाचे सचिव यांचे संयुक्त निर्णयासाठी प्रलंबित असल्याने पुढील निर्णय थांबला आहे. जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी यांची पदोन्नती गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेकडील राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग झालेल्या योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडील कृषी विभागास राबविण्यासाठी देण्यात याव्या, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व कृषी अधिकारी सहभागी झाले असून, ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यामुळे जिल्हा परिषदेची कृषीविषयक कामे ठप्प होणार असून, ऐन हंगामात शेतकर्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
कृषी अधिका-यांची लेखणी बंद; कामकाज ठप्प!
By admin | Published: October 04, 2016 2:50 AM