कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यमापनाच्या पद्धतीचा आधार घेण्यात आला. दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार वाशिम, मालेगाव, कारंजा आणि मानोरा तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला, तर मंगरुळपीर तालुक्याचा ९९.९६ टक्के आणि रिसोड तालुक्याचा ९९.९५ टक्के निकाल लागला.
--------------
संकेतस्थळ क्रॅश झाल्याने पालक, विद्यार्थी निराश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते ; परंतु दुपारचे २ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परिणामी साईट क्रॅश झाली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंतही साईट पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होत्या.
--------
असे होते मूल्यमापनाचे सूत्र
विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असून, विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनात- ३० गुण, विद्यार्थ्यांचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनात २० गुण, विद्यार्थ्यांच्या नववीच्या अंतिम निकालात विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
----
कोट: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षांना प्रविष्ट झालेल्या १९,१९१ विद्यार्थ्यांपैकी १९,१८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले असून, जिल्ह्याचा निकाल ९९.९६ टक्के ठरला आहे.
-आकाश आहाळे,
उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक )
-