- प्रफुल्ल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: नगर परिषदेच्या निवडणुकीपासून राजकारण सुरू करून गत विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान महासचिव युसूफ पुंजाणी पक्षांतर्गत धोरणांप्रती नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून प्राप्त झाली.युसूफ पुंजाणी यांनी कारंजा व मानोरा नगर परिषदेमध्ये भारिप-बमसंची सत्ता स्थापन केली. तसेच मंगरूळपीर येथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावली; तर वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाला. गेल्या अनेक वर्षात भारिप-बमंसचे जिल्ह्यात अस्तित्व नव्हते. ते गतवेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर उभारून आले. त्यामुळेच अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुंजाणी यांना बहाल केलेले प्रदेश महासचिव पद, जिल्हाध्यक्षपदाचे अधिकारही कुचकामी ठरले. दरम्यान, गत चार वर्षात पक्षांतर्गत होणारी घुसमट, अनुशासनाची उणिव आणि स्वपक्षातीलच काही नगरसेवकांनी वेळोवेळी केलेले बंड व त्यावर पक्ष नेतृत्वाने घेतलेली बघ्याची भूमिका, याप्रती युसूफ पुंजाणी नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री सुभाष ठाकरे व चंद्रकांत ठाकरे यांनी संपर्क साधल्याने पुंजाणी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू आहे.उमेदवारी जाहीर न करता झाल्या इच्छुकांच्या मुलाखतीआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ यांची उमेदवारी पक्षाने औरंगाबाद विधानसभा मतदार संघाकरिता जाहीर केली. त्या धर्तीवर कारंजा-मानोरा मतदार संघासाठी पुंजाणी यांची उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता काही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही बाब पुंजाणी व समर्थकांना खटकली आहे.
काँग्रेस, रा.काँ.कडून आॅफरभारिप-बमसंचे पक्षप्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिल्याने दोन्ही पक्षांकडून युसूफ पुंजाणी यांना आपापल्या पक्षात समाविष्ट करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
मी सद्य:स्थितीत भारिप-बहुजन महासंघाच्या प्रदेश महासचिवपदी कायम असून अन्य काही राजकीय पक्षांमधील नेतेमंडळी माझ्या संपर्कात आहे; मात्र मी पक्षाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे.- युसूफ पुंजाणी, कारंजा लाड