वाशिम : देशातील कोट्यवधी बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (ता.मानोरा) येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, २१ एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले.
पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज व महंत सुनील महाराज यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.पोहरादेवी यात्रेसाठी अनेक वर्षांपासून देशभरातून विविध समाजातील लाखो लोक येतात. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी देवस्थानचे महंत, विश्वस्त व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तरी भाविकांनी यावर्षी राम नवमीला आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करावा. तसेच कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी प्रार्थना करावी. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना संसर्गामुळे पोहरादेवी यात्रा रद्द करण्यात आल्याने कोणीही पोहरादेवी येथे येवून नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र व महंत सुनील महाराज यांनी यावेळी केले.गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना संसर्ग वाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. पोहरादेवी येथे दरवर्षी लाखो भाविक येतात, या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यंदा यात्रा आयोजित करणे उचित होणार नाही. राज्यात सर्वत्रच हा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे गतवर्षी पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे सर्व विश्वस्त, महंत आणि भाविकांनी यात्रा रद्द करून ज्याप्रमाणे सहकार्य केले, त्याप्रमाणे यावर्षी २१ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा रद्द करून कोरोना संसर्ग रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी देवस्थानचे महंत, विश्वस्त यांना केले. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सुध्दा यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका उपस्थितांच्या लक्षात आणून दिला.कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांना सर्व समाज बांधव सहकार्य करतील, असे आश्वासन महंतांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच सर्व समाजबांधवांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.