अमरावती, अकोला आणि यवतमाळ हे तीन जिल्हे वाशिम जिल्ह्यास लागून आहेत. वाशिमच्या तुलनेत या तीनही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. अकोला जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत २७ हजार २०० लोकांना, यवतमाळ जिल्ह्यात २७ हजार ५५१ लोकांना, तर अमरावती जिल्ह्यात ४९ हजार २७ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर वाशिम जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत १५ हजार ६२५ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. अर्थात वाशिमच्या तुलनेत यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जवळपास दुप्पटच आहे, तर अमरावती जिल्ह्यात तिप्पट आहे. या तीनही जिल्ह्यातून दरदिवशी हजारो नागरिक वाशिम-जिल्ह्यात ये-जा करतात. त्यात कोरोना वाहकांचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
एसटीमधून सर्वाधिक नागरिकांचा प्रवास
अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या तिन्ही जिल्ह्यांत वाशिम येथून दरदिवशी ५० पेक्षा अधिक एसटीची ये-जा सुरू असते. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील किमान १५०० प्रवासी वाशिम येथे प्रवास करतात. या प्रवाशांत कोरोना वाहक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------------------
१५ ट्रॅव्हल्सची रात्री वाहतूक
जिल्ह्यात दिवसा धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या कमी असली तरी रात्री औरंगाबाद, नांदेड, पुणे येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस अकोला, अमरावती, यवतमाळ येथे जातात, तर अमरावती, अकोला आणि यवतमाळ येथून वाशिम येथे १५ खासगी बस वाशिम जिल्ह्यात दाखल होतात. या बसमधून साधारण ४०० प्रवासी वाशिम जिल्ह्यात दरदिवशी दाखल होतात.
------------
रेल्वेने अकोल्यात प्रवाशांची ये-जा
जिल्ह्यात वाशिम येथे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणाहून हिंगोली, नांदेड, अकोला येथेच वाशिमकरांना प्रवास करता येतो. त्यात अकोला येथे रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून, हिंगोली, नांदेडच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. साधारण वाशिम-अकोला येथील २०० प्रवाशांची या ठिकाणाहून दरदिवशी ये-जा सुरू असते.
-----------
बाहेरगावहून येणाऱ्यांची चाचणीच नाही
वाशिम जिल्ह्यात अमरावती, अकोला, यवतमाळसह बुलडाणा जिल्ह्यातूनही दरदिवशी हजारो प्रवासी दाखल होतात; परंतु जिल्ह्यातील कोणत्याच बसस्थानकावर या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा नसून, रेल्वेस्थानकावरही कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे प्रवास करून आलेले नागरिक थेट शहरात प्रवेश करतात. शिवाय जिल्ह्याच्या कोणत्याच सीमेवरही आता कोरोना चाचणी करण्याची तसदी घेतली जात नाही.
---------
एकूण कोरोनाबाधित : १५६२५
बरे झालेले : १२७१६
उपचार सुरू असलेले : २७२३
गृह विलगीकरणातील व्यक्ती -१५००
कोरोना बळी : १८५
------------