ग्रामीण भागातील स्त्रियांचे चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व जाळण्याकरितापणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, बायोगॅस प्रकल्पापासून निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी करून सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, शौचालयांची जोडणी बायोगॅस संयंत्रास करून गाव परिसर स्वच्छ राहावा, आदी उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अमलात आली. याअंतर्गत गेल्या २२ वर्षांत जिल्ह्यात तीन घनमीटर क्षमतेचे २१२० बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले. मात्र, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे जनावरांची संख्या घटल्याने बायोगॅस प्रकल्पांना शेण मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, ५० टक्क्यांपेक्षा अधिक बायोगॅस प्रकल्प बंद पडले आहेत. तसेच बायोगॅस प्रकल्पाची शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याने ही योजना संपुष्टात येण्याच्या मार्गाप्रत पोहोचली आहे. दरम्यान, चालूवर्षी जिल्ह्यात २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे.
.....................
कोट : जिल्ह्यात गत दोन वर्षांत प्रत्येकी १६ हजार ६०० रुपये अनुदान देय असलेले २७ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले असून यंदा २६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
- विकास बंडगर
कृषी विकास अधिकारी, जि.प., वाशिम