वाशिम : यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, याचा फटका विविध सण, उत्सवालादेखील बसत आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने यंदा नवरात्रोत्सवादरम्यान दांडिया, देवीचा जागरही सार्वजनिक स्वरुपात राहणार नसल्याने उत्सवावर विरजण पडणार आहे. दरम्यान, आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान शिबिर, कोरोनासह साथरोगापासून बचाव कसा करावा आदी सामाजिक उपक्रम आॅनलाईन पद्धतीने तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात भाविकांचा आनंद ओसंडून वाहत असतो. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. सध्याही जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत सार्वजनिकरित्या कार्यक्रम सादर करण्यास मनाई आहे. नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही, देवीचा जागरलाही मर्यादा राहणार आहेत. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव दांडियाविनाच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. आॅक्टोबर महिन्यातील नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊनच फिजिकल डिस्टन्सिंग व मर्यादीत स्वरुपात दुर्गाेत्सव साजरा केला जाणार आहे.
यंदा दांडिया, जागरविनाच नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 12:41 PM