कधी एकदाची वार्षिक परीक्षा संपते आणि केव्हा शाळेला सुट्या लागतात, याची प्रचंड उत्सुकता शाळकरी मुलांना असते. एकदा का शाळेला सुट्या लागल्या की, मामाच्या गावी जाऊन मजा करण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात रूढ आहे. परंतु, यावर्षी १ ते ८ वीच्या परीक्षा रद्द झाल्याने उन्हाळ्याच्या सुट्या लागण्याच्या आधीपासूनच मुले घरीच आहेत. यासोबतच राज्य शासनाकडून कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरातच आहेत. त्यामुळे बाहेरगावी जाणे दुरापास्त झाले आहे.
शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या नावावर राज्यभर संचारबंदी जाहीर केली. आपल्याच शहरात अकारण बाहेर पडणेही महागात पडणार आहे. अशा स्थितीत महिलाच्या माहेरी जाण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. चिमुकल्यांनासुद्धा काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.