लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही इयत्ता अकरावीतील प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने न होता शाळास्तरावरच होणार आहे. तुर्तास दहावीच्या गुणपत्रिका मिळण्याची प्रतिक्षा असून, त्यानंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर केले जाणार आहे.यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात अनुदानित ८०, विनाअनुदानित ६१, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित २६ अशा एकूण १६७ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संख्येनुसार अकरावीच्या २७३ तुकड्या आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या १११ वर्गतुकडीत ८८८० जागा, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११२ वर्गतुकडीत ८९६० जागा, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाच्या ५० वर्गतुकडीत चार हजार जागा उपलब्ध आहेत. कला शाखेसाठी १०८८०, विज्ञान शाखेसाठी ९४४०, वाणिज्य शाखेसाठी ६४० तर अन्य शाखेसाठी ८०० जागा आहेत.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी अकरावीतील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राबवावयाची यासंदर्भात शिक्षण विभागात विचार मंथन सुरू आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया न राबविता, शाळा स्तरावरच प्रवेश प्रक्रिया होणार आहे. परंतू, कोरोनामुळे आणि दहावीच्या गुणपत्रिका न मिळाल्याने अद्याप वेळापत्रक जाहिर करण्यात आले नाही. आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी की शाळा स्तरावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्रवेश प्रक्रिया घ्यावी याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. प्रवेश अर्ज भरताना, गुणपत्रिकेची झेरॉक्स, टीसी, बोनाफाइड प्रमाणपत्राची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, क्रीडा व कला नैपुण्य प्रमाणपत्र झेरॉक्स आदी कागदपत्रे लागणार आहेत. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन अकरावीतील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर केले जाईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
यावर्षीही शाळा स्तरावरच होणार अकरावीचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 12:30 PM