१५१ वर्षांपासून वासुदेव महाराज बोराळकर बोराळा (ता. मालेगाव) पालखी सोहळा हा जिल्ह्यातून पंढरपूरला जात असते. माऊली संस्थान आळंदीकडून या पालखी सोहळ्याला नोंदणी क्रमांकदेखील मिळालेला आहे.
00
जिल्ह्यातून जवळपास ४५ दिंड्या पंढरपूरला जात असतात. यामध्ये वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा तालुक्यातील दिंड्यांचा समावेश आहे.
00
सलग दुसऱ्या वर्षीही विठुमाऊलीचे दर्शन नाही
गेल्या ४० वर्षांपासून पंढरपूरची अखंड वारीची परंपरा जोपासली आहे. गतवर्षी कोरोनामुळे पंढरपूरला जाता आले नाही. यावर्षीही कोरोनाचे सावट असल्याने जाता येणार नाही.आजारपणातसुद्धा वारीची परंपरा खंडित झाली नव्हती. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परंपरा खंडित झाल्याचे शल्य आहे. सलग दुसऱ्या वर्षीही तेथे कीर्तन ऐकणे, चंद्रभागेत स्नान करणे आणि रिंगण सोहळयाचे व विठ्ठलाचे दर्शन यापासून मुकावे लागणार आहे. यंदाही गावातच राहून आषाढी एकादशीनिमित्त घरीच विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होऊ..
-केशव महाराज वारकरी.
00000000000000
पालखी सोहळ्याचा लाभ घेता येणार नाही
कोरोनामुळे यंदाही चंद्रभागेतील पवित्र स्नान आणि पालखी सोहळ्याचा लाभ घेता येणार नाही, याची खंत राहणार आहे. मी १५ वर्षांपासून पंढरीची वारी करत आलो आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा वारी खंडित झाली. आषाढी एकादशीला सर्व संतांची मांदियाळी पंढरीला अवतरते. दरवर्षी वारीत सहभागी होऊन भाविक, भक्तांच्या संगतीत रममाण होत असतो. राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी सांप्रदाय, संतांची कामगिरी अनन्यसाधारण राहिली आहे. दिवाळी सण जसा लोकांसाठी महत्त्वाचा असतो; तसे वारकऱ्यांसाठी पंढरपूरची आषाढी वारी महत्त्वाची असते. कोरोनामुळे यावर्षीही आषाढी एकादशीला माऊलीचे दर्शन होणार नाही याची खंत वाटत आहे.
- सुनील महाराज घायाळ.
000000000
घरीच राहून विठुनामाचे स्मरण करू
मी २५ वर्षांपासून अखंडपणे माऊलीच्या पालखीसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारीत पायदळ जात असतो. गेल्या २५ वर्षांत अनेक चढ-उतार पाहिलेत. परंतु, पंढरपूरच्या वारीची परंपरा कधीच खंडित होऊ दिली नाही. गेल्यावर्षी कोरोना विषाणूमुळे पायदळ वारीची परंपरा खंडित झाली. यंदाही वारीवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे वारीत जाता आले नसले तरी घरीच राहून विठुनामाचे स्मरण करणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढपुरात वारकऱ्यांची मांदीयाळी असते. यावर्षी कोरोनामुळे विरजण पडले आहे. यावर्षीही गावातच घरी राहून आषाढी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आहे.
- गणेश महाराज हुंबाड.
00000000000
सर्व चित्त माऊली चरणी..!
मी गत काही वर्षांपासून अखंडपणे माऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरपर्यंत वारीत पायदळ जात असते. या कालावधीत अनेक कठीण प्रसंग व सुख दु:खं येऊन गेलीत; पण पंढरीची ही वारी कधीही चुकवली नाही. दरवर्षी विठुमाऊलीचे दर्शन घेऊन धन्य झाल्याचे वाटायचे. वारीत कित्येक किमी अंतर पायदळ कापूनही कधी किंचितही थकवा जाणवला नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे पंढरपूरच्या वारीत जाता आले नाही. यंदाही कोरोनामुळे जाता येणार नाही, याची मनाला खंत असली तरी सर्व चित्त विठ्ठल माऊली चरणी लागले आहे. विठु-माऊलीच्या कृपेने यावर्षी कोरोना स्वरुपात आलेल्या संकटाला आम्ही घरी बसूनच हरविणार असून, पुढच्या वर्षी आम्ही वारकरी आषाढी एकादशीला निश्चित जाणार आहे. यावर्षी घर राहूनच विठुनामाचे स्मरण करू!
- ज्ञानेश्वर महाराज सरकटे.