उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच गत सत्रात शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले, तर उन्हाळ्यात धान्य वाटपही करणे शक्य झाले नाही. आता या आहाराचे पैसे थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तयार ठेवण्यात यावी, ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शुक्रवार, २५ जूनरोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ११२० शाळांतील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात उन्हाळी सुट्यातील पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी मात्र खाते नसलेल्या विद्यार्थ्यांना खाते उघडावे लागणार आहे.
-----------
कोणत्या वर्गात विद्यार्थी
१) पहिली - १९६९०
२) दुसरी - २०९९८
३) तिसरी - १९६९८
४) चौथी - २११७७
५) पाचवी -२१०५२
६) सहावी -२११३६
७) सातवी -२१४३६
८) आठवी -२१५००
-----------
बॉक्स : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये
------
बॉक्स : पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये
------
कोट : उन्हाळी सुट्यांतील पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. याबाबत पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आधीच खाते असलेले विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यास कळविले आहे.
- गजाननराव डाबेराव.
प्र. उपशिक्षणाधिकारी,
जि. प., वाशिम
------------------
कोट : माझा पाल्य सहाव्या वर्गात होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. आता त्याची रक्कम मिळणार असल्याने ६०० रुपयांसाठी ५०० रुपये खर्च करून खाते उघडण्यास सांगण्यात येत आहे. हे मुळीच परवडणारे नाही.
- संतोष पवार,
पालक
--------
कोट : माझा पाल्य तिसरीत शिक्षण घेत होता. त्याला उन्हाळ्याच्या सुटीतील पोषण आहार मिळाला नाही. त्याऐवजी खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे कळते; परंतु केवळ ४०० रुपयांसाठी हे खाते उघडणे मुळीच परवडणार नाही.
- संतोष इंगोले,
पालक
------
बँक खाते उघडण्यासाठी लागणार ५०० रुपये
१) मागे शासनाने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी कुठलीही रक्कम ठेव म्हणून भरण्याची अट काढली होती. त्यामुळे अनेकांना झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे शक्य झाले आता. ही योजना बंद आहे.
२) झिरो बॅलेन्सवर खाते उघडणे बंद झाले असून, नव्या खात्यासाठी खातेदारांना ठराविक रक्कम भरावीच लागते. खात्यात ठेव असल्याशिवाय नवे खाते उघडून दिले जात नाही.
३) विद्यार्थ्यांना नवे खाते उघडायचे असेल, तर कोणत्याही बँकेत किमान ५०० रुपये तरी रक्कम भरावीच लागते, ही रक्कम भरल्याशिवाय खाते उघडून मिळू शकत नाही.