वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत एरंडा येथे भरवस्तीत मंदिरासमोर शेतीच्या वादातून युवा शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडचे वार करून हत्या केल्याची घटना बुधवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. गजानन उत्तम सपाटे (वय ४५ वर्षे) रा. एरंडा, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी जऊळका रेल्वे पोलिसांनी ९ आरोपींवर विविध कलमनान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे शिवाजी उत्तम सपाटे (वय ४१ वर्षे) रा. एरंडा, ता. मालेगाव यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा मोठा भाऊ मृतक गजानन उत्तम सपाटे आई-वडिलांसोबत राहून वडिलांच्या नावे कारली शिवारात गट क्रमांक ३१४ मधील १४ एकर २३ गुंठे शेती मृतकच वाहत होता. या जमिनीचा कारली येथील नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे, किसन सखाराम डुकरे, नर्मदाबाई सखाराम डुकरे, यांच्यासोबत न्यायालयात प्रविष्ट आहे.
अशातच ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता मृतक गजानन सपाटे यांनी कारली शिवारातील काढून आणलेले व गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवलेले सोयाबीन पाहण्यासाठी फिर्यादी व त्याची वहिनी चित्रा गजानन सपाटे गेले. त्यावेळी कारली येथील नारायण डुकरे हा मृतक गजानन सपाटेला लोखंडी रॉडने व मधुकर डुकरे व किसन डुकरे हे काठ्यांनी मारहाण करीत होते. तर विठ्ठल वाघ, गजानन वाघ यांनी गजानन सपाटेला पकडून ठेवले होते, तसेच नर्मदा डुकरे, सुरवता डुकरे, ज्योती डुकरे व चंदा डुकरेसुद्धा गजानन सपाटेला मारहाण व शिवीगाळ करीत होत्या, ते पाहिल्याने फिर्यादी ओरडत त्यांच्याकडे गेला. त्यावेळी गजानन डुकरे लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावला. त्यामुळे फिर्यादी बाजूला गेला.
आरोपींनी मारहाण केल्यामुळे गजानन सपाटे रक्तबंबाळ अवस्थेत मंदिराच्या ओट्यावर पडला होता. त्यानंतर सर्व आरोपी एमएच ३७ टी १६७० क्रमांकाच्या वाहनाने पळून गेले. त्यांच्यापैकी एका आरोपीचा मोबाईल तिथेच पडला होता. नमूद आरोपींनीच मारहाण करून गजानन सपाटेला जिवाने ठार मारले, अशा फिर्यादीवरून आरोपी नारायण डुकरे, मधुकर डुकरे, किसन डुकरे, विठ्ठल वाघ, गजानन वाघ, नर्मदा डुकरे, सुरवता डुकरे, ज्योती डुकरे, चंदा डुकरे, यांच्यावर जऊळका पोलिसांनी कलम ३०२, ४३, १४७ ,१४८, ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.