लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेतले जाणार असून, प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचाºयांपैकी एका जणांची ‘मार्गदर्शक’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.‘युवा माहिती दूत’ या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवकांना शासकीय योजनांची माहिती होतकरू, पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवावी लागणार आहे. या उपक्रमामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांला शासनाच्या कल्याणकारी योजनांची अचूक माहिती तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.दारिद्र्यरेषेखालील, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती पोहचविण्याचे काम युवा माहिती दुतांना करावे लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील प्राध्यापक वा शिक्षकेतर कर्मचारी यापैकी एक ‘मार्गदर्शक’ म्हणून नेमण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून या मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट राहणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी ‘माहितीदूत’ होण्यासाठी स्वत:हून या अॅप्लिकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करतील. मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत राहणार आहे. या उपक्रमाची जनजागृती शाळा, महाविद्यालया स्तरावर केली जात आहे. जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी हे नोडल अधिकारी असून, प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हे मार्गदर्शक महाविद्यालयाची नोंदणी करणार आहेत. संबंधित अॅपवर ‘माहिती दूत’ होण्याची इच्छा व्यक्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाला संबंधित महाविद्यालयातील ‘मार्गदर्शक’ मंजूरी देतील किंवा नामंजूर करू शकतील.
‘युवा माहिती दूत’ : शाळा, महाविद्यालयांत जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:17 PM