संतोष वानखडे /वाशिम: रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी युवावर्ग मोठ्या संख्येने समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०.८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१४ मध्ये १४.९२ लाख यूनिटवर गेले असून, २०१५ च्या सहामाहीत ते आठ लाख युनिटच्या आसपास आहे. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते; कारण आयुष्यात दानधर्म करुन जेवढे पुण्य लाभत नाही, तेवढे एखाद्याला रक्ताद्वारे जीवदान दिल्याने लाभते, असे म्हटले जाते. एखाद्याला जीवदान देण्यासाठी आता सर्व वयोगटातील नागरिक समोर येत असल्याने साहजिकच रक्तपेढीतील ऐच्छिक रक्तसंकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते.राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. १०.८६ लाख युनिट म्हणजे १०.८६ लाख बॅग. अर्थात रक्तदातेही १०.८६ लाख! २०११ मध्ये २८२ रक्तपेढ्यांतून ११.९२ लाख युनिट, २०१२ मध्ये २९१ रक्तपेढ्यांतून १३.२९ लाख युनिट, २०१३ मध्ये ३०० रक्तपेढ्यांतून १३.९० लाख युनिट आणि २०१४ मध्ये ३१० रक्तपेढ्यांतून १४.९२ लाख युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दप्तरी आहे. २०१५ च्या सहामाहित आठ लाख युनिटच्या आसपास रक्तसंकलन झाले आहे. एकूण आणि ऐच्छिक रक्तसंकलन यावर नजर टाकली तर ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ कमालिचा वाढत असल्याचे दिसून येते. २०१० मध्ये एकूण रक्तसंकलन १२.६६ लाख युनिट होते. यापैकी १०.८६ लाख युनिट रक्त संकलन ऐच्छिक रक्तदानातून झाले होते. २०१४ मध्ये १५.५९ पैकी १४.९२ लाख युनिट ऐच्छिक रक्तदानातून झालेले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, १५.५९ रक्तदात्यांपैकी १४.९२ लाख रक्तदाते ऐच्छिक या प्रकारातील आहेत.
रक्ताची नाती जोडण्यासाठी युवक सरसावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2015 1:20 AM