भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:04 PM2018-10-12T16:04:35+5:302018-10-12T16:06:39+5:30
नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नवरात्रोत्सवाला सुरूवात होत नाही; तोच महावितरणच्यावतीने भारनियमन घेण्याला सुरूवात झाली. नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला.
सध्या जिल्ह्यात विजेच्या तुटीचे कारण समोर करून काही फिडरवरून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. नेमकी नवरात्रोत्सव, नवदुर्गा उत्सवाला सुरूवात होण्याच्या कालावधीतच भारनियमन घेतले जात असल्याने भाविकांच्या उत्सवावर विरजन पडत आहे. भाविकांसह शेतकºयांना त्रासदायाक ठरणारे भारनियमन रद्द करावे, भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी सरकारच्या शेतकरीविरोधी व सर्वसामान्य जनतेविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सत्तेत आल्यानंतर लवकरच महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचे खोटे आश्वासन देणाºया भाजपा सरकारने आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांमार्फत राज्यशासनाला निवेदन देत भारनियमन तत्काळ बंद करावे अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने लवकरच जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शिंदे यांच्यासह पदाधिकाºयांनी दिला. यावेळी वाशिम पंचायत समिती सभापती गजानन भोने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव सोळंके, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गजानन गोटे, उपाध्यक्ष सागर म्हैसने, सिद्धार्थ सावध, मोहन इंगोले, बबन सावळे, सरपंच बद्री लाळगे, भारत पोळकर, अनिल शिंदे, गणेश देव्हडे, विवेक खानझोडे, निखिल वानखेडे, गजानन शिंदे, मोहिउद्दीन खतीब, रामेश्वर इढोळे, बाळू गोटे, मनोज कालवे, गजानन वायचाळ यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.